कोरोना व्हायरसने सध्या बलाढ्य देश असलेल्या चीनला हैराण केले आहे. 'कोरोना' मध्य चीनच्या वुहान प्रांतातून सुरु झाला. सध्या संपूर्ण देशाला या आजाराने वेठीस धरले आहे. शिवाय जगभर याची दहशत वाटत आहेमुळात वुहान प्रांतात डिसेंबरमध्येच कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव झाला होता. परंतु सरकारने ही गोष्ट गुप्त ठेवली. सुरवातीपासूनच लपवाछपवी सुरु केली, परंतु हा आजार इतक्या मोठ्या प्रमाणावर पसरला की सरकारला ते मान्य करावे लागले. शिवाय सरकारने देशात आणीबाणी लागू केली. चीनमध्ये आतापर्यंत ५६० च्या वर व्यक्ती कोरोनाचे बळी ठरले आहेत. तर देशात २० हजारांहन अधिक माणसांना या आजाराची लागण झाली आहे. चीनच नव्हे तर सारे जगच यामुळे हादरुन गेले आहे. एवढी भीषण परिस्थिती चीनमध्ये उद्भवली त्याला सरकारची गोपनीयता कारणीभूत आहे. सुरवातीलाच परिस्थिती मान्य करुन दक्षता घेतली असली तर ही वेळ उद्भवली नसती, आज कोरोना आजार आटोक्यात नाही, ही वस्तुस्थिती आहे. ही भीषण परिस्थिती उद्भवली तशी स्थिती आपल्या देशात उद्भवू नये यासाठी अनेक देशांनी उपाय योजना सुरु केल्या आहेत. आपल्या देशाच्या आरोग्य मंत्र्यांनीही काही सूचना केल्या आहेत जेणेकरुन कोरोना देशाला त्रस्त करु नये, सोलापुरातही सिव्हिलमध्ये कोरोनासाठी स्वतंत्र कक्ष स्थापण्यात आला आहे ही खरोखरच चांगली गोष्ट आहे. चीनमध्ये जगाच्या २० टक्के लोकसंख्या आहे तर जगाच्या ५० टक्के जनावरे या देशात आहेत. यामुळे नेहमीच येथून वेगवेगळे आजार निर्माण होतात आणि मोठया प्रमाणात पसरतात. सार्स, बर्डफ्लु ही काही उदाहरणे होत. वेगवेगळे पशु, पक्षी, कीटक, प्राणी इत्यादी चीनच्या जनतेचे खाद्य आहे. बाजारात हे सर्व प्राणी आणि भाजीपाला एकत्र विकलाजातो. प्राण्यांच्या शरिरात असणारे व्हायरस भाज्यातही जातात. त्यामुळे विविध आजारांचा उद्भव होतो. यापासून आपणही बोध घेतला पाहिजे. कोरोनाची लक्षणे थंडी-ताप, खोकला अशी न्युमोनियासारखीच असतात. कोरोनावर अद्याप औषध उपलब्ध नाही. हा आजार पशुपासून होतो असे मानले जायचे. पण हा आजार माणसांपासून माणसांना होतो असे उघड झाले आहे. जिथे माणसे आणि प्राणी एकत्रितपणे जास्त काळ राहतात, जिथे प्राण्यांचे मांस, अवयव यांचा साठा अस्वच्छ आणि असुरक्षित असतो. तेथूनच हा आजार पसरण्याची शक्यता जास्त असते. यासाठी स्वच्छतेचे नियम पाळणे आवश्यक असते.
कोरोनाचा मुकाबला करण्यास सज्ज होणे आवश्यक