'प्यासा' चित्रपटाचा समावेश भारतीय क्लासिक सिनेमांमध्ये होतो. 'प्यासा' १९५७ मध्ये प्रदर्शित झाला. तो खूपच गाजला. आजही त्या चित्रपटाला रसिक विसरले नाहीत. 'प्यासा' च्या यशात त्याची गीते आणि संगीताचा वाटा मोठा आहे. कवीच्या जीवनावर हा चित्रपट बेतलेला होता. स्वाभाविकच चित्रपटात गीतांना महत्व होते. चित्रपटाची गाणी साहीर लधियानवी यांनी लिहिली होती तर संगीत दिले होते एस.डी. बर्मन यांनी. दोघेही प्रतिभावान कलावंत. या जोडीने 'प्यासा' पूर्वी जाल, बाजी, नौजवान, टैक्सी ड्रायव्हर, फंटूश असे अनेक चित्रपट गाजवले होते. परंतु 'प्यासा वेळी या दोधा कलावंतात 'इगो' चा प्रश्न उभा राहिला आणि सारेच बिनसले. 'प्यासा' हा या जोडीचा अखेरचा चित्रपट ठरला. दोघांची जोडी फुटली. साहीरच्या मते चित्रपटातील माण्यांनाच महत्व असते, त्या मानाने संगीत महत्वाचे नाही, एस.डी. बर्मन यांना ही गोष्ट कशी रुचणार. शिवाय मी संगीतकारापेक्षा जास्त मानधन घेणार ही साहीर यांची अट होती. स्वाभाविकपणे दोघे दूर झाले ते कायमचेच, प्यासानंतर गुरुदत्तनी कागज के फूल' साठी एस. डी. ना संगीतकार म्हणून घेतले, पण गाणी कैफी आजमी यांनी लिहिली. दुसरी गोष्ट म्हणजे मानधनाच्या अरीमुळे साहीर यांनी नेहमी दुष्यम दर्जाच्या संगीतकारांबरोबर काम केले. सप्त चक्रवती, रवींद्र जैन यांच्या बरोबर साहिरनी काम केले. यात रसिकांचे मोठे नुकसान झाले. त्यानंतर साहीर आणि एस. डी. यांनी मिळून रसिकांना श्रवणीय गाणी दिली नाही. या दर्जेदार गाण्यांना रसिक मुकले, एवढे खरे।
साहीर आणि एस. डी. बर्मन यांची जोडी फुटली